Pakistan Cricket, T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा वादग्रस्त डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय बदलला असून तो जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत निवडीसाठी उपलब्ध असेल. स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली आमिरला 2010 ते 2015 दरम्यान बंदीला सामोरे जावे लागले आणि काही काळ त्याचा तुरुंगातही गेला.
यापूर्वी, पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू आणि यावेळी इस्लामाबाद युनायटेडला पीएसएल चॅम्पियन बनवणारा इमाद वसीम देखील निवृत्तीतून परतला होता आणि त्याने आगामी टी-20 विश्वचषकासाठी स्वत:ला उपलब्ध घोषित केले होते.
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होते. तो जगभरात T20 लीग खेळत आहे आणि आता मोहसीन नक्वी यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला पुनरागमन करण्यास राजी केले आहे.
परतल्यावर आमिर काय म्हणाला?
आमिरने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, ‘पाकिस्तानसाठी खेळणे हे एक स्वप्न आहे. आयुष्यात अनेक वेळा अशी वळणे येतात की आपल्याला आपले निर्णय बदलावे लागतात. माझ्यात आणि पीसीबी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी मला हे जाणवून दिले की, पाकिस्तान क्रिकेटला माझी गरज आहे आणि मी अजूनही खेळू शकतो.’
2020 मध्ये खेळला होता शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना…
आमिरने पाकिस्तानसाठी शेवटचा टी-20 सामना ऑगस्ट 2020 मध्ये मँचेस्टरमध्ये खेळला होता. त्याला काकुल येथील राष्ट्रीय शिबिरासाठी बोलावले जाऊ शकते. तो म्हणाला की, माझे कुटुंब आणि माझ्या चाहत्यांशी चर्चा केल्यानंतर मी आगामी T20 विश्वचषकासाठी उपलब्ध आहे. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचे आहे कारण ते माझ्या वैयक्तिक निर्णयांपूर्वी येते. हिरवी जर्सी घालणे आणि देशाची सेवा करणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे.
IPL 2024 (#RRvLSG Match 4) : राहुल-पूरनची अर्धशतके व्यर्थ, लखनौनं जिंकलेला सामना गमावला….
T20 विश्वचषकात खेळू शकतो पाकिस्तानकडून…
लवकरच 32 वर्षांचा होणारा आमिर आतापर्यंत 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 50 टी-20 सामने खेळला आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 259 विकेट घेतल्या आहेत. आमिरने कसोटीत 119, एकदिवसीय सामन्यात 81 आणि T20 मध्ये 59 विकेट्स घेतल्या आहेत.