IIT-BHU Gangrape : वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) आयआयटी विद्यार्थिनीवर 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना तब्बल 60 दिवसांच्या शोधानंतर अटक करण्यात आली आहे. वाराणसी पोलिसांचे सहा पथक आरोपींच्या शोधात होते अखेर रविवारी आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विद्यार्थिनीसोबत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेची संपूर्ण कहाणी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितली आहे.
एका संकेतस्थळानुसार, प्रत्यक्षदर्शी हे बीएचयू-आयआयटीचे विद्यार्थी आहेत. पीडिता प्रत्यक्षदर्शींची कनिष्ठ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने सांगितले की, तीन बुलेटस्वार आरोपींनी बंदुकीच्या धाकावर पीडिता आणि तिच्या मित्राला पळवून घेऊन गेले. ज्याठिकाणी हृदयद्रावक घटना घडली तिथे पीडिता घाबरलेली आणि वाईट अवस्थेत आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
प्रत्यक्षदर्शी म्हणाला, ‘त्या दिवशी रात्री थोडा उशीर झाला होता. आम्ही सर्व रात्रीचे जेवण करून परत आलो होतो आणि कॅम्पसच्या आत जात होतो. मी पण गाडी पार्क करून आत जात होतो. तेवढ्यात एक मुलगा घाबरून येताना दिसला.त्याने मला येऊन विचारले,बिथून कोणती बुलेट जाताना दिसली का ? मी नकार दिला कारण आम्ही नुकतेच परतलो होतो. मी त्याच्याशी याबद्दल बोललो तेव्हा मला कळले की तो आमच्या कॉलेजचा मुलगा आहे. तो आमचा कनिष्ठ आहे. तेव्हा त्याने सांगितले की तो आणि एक मुलगी काही कामानिमित्त फिरत होते.
प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितले की, मुलाने सांगितले की तीन लोक आले, त्यांनी दोघांना बंदुकीच्या धाकावर घेऊन गेले आणि त्यांच्या जवळील मोबाईल काढून घेत मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर प्रत्यक्षदर्शीने त्याच्या मित्रांना आणि प्रॉक्टरच्या कार्यालयात बोलावले आणि मुलीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला.
प्रत्यक्षदर्शी म्हणाला, ‘मुलगी 1-2 मिनिटांनी सापडली. त्यानंतर त्या मुलांचाही शोध घेण्यासाठी निघाले, पण ते सापडले नाहीत. मुलगी खूप घाबरली आणि स्वतःला वाचवण्यासाठी प्रोफेसरच्या घराच्या आत धावली. प्रोफेसरच्या घराचा दरवाजा ठोठावला. ती ज्या अवस्थेत आढळून आली ती अवस्था शब्दात देखील सांगू शकत नाही असे त्याने सांगितले.
दरम्यान, BHU-IIT गँगरेपमधील आरोपींची नावे कुणाल पांडे, अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल अशी आहेत. तिन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. रविवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कुणाल पांडे हा ब्राइड एन्क्लेव्ह कॉलनी सुंदरपूर, वाराणसी येथील रहिवासी आहे. अभिषेक चौहान हा जीवधिपूर बाजारडिहा येथील रहिवासी असून सक्षम पटेल हा बाजरडिहा येथील रहिवासी आहे.