Akshay Kumar : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. मागील काही दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता नववर्षाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारने त्याच्या या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
अक्षय कुमारने 1 जानेवारीला X हँडलवर टायगरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमार म्हणाला, ‘ छोट्या-छोट्या आनंदातून तुमचं नवं वर्ष मोठं व्हावं. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ कडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ईदच्या दिवशी थिएटरमध्ये भेटुयात. लेट्स रॉक 2024′. अक्षय आणि टायगरचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिल 2024 प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याआधी जवळपास 75 दिवस या चित्रपटाचे प्रमोशन केले जाणार आहे. अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, संगीत आणि थरार असलेला हा एक मोठा चित्रपट आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची निर्मिती वासू भगनानी आणि जॅकी भगनानी यांचं प्रॉडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली होणार आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसह सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर यांच्याही भूमिका असणार आहे. तर अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. बॉलिवूडची सर्वात हॉट अॅक्शन जोडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे दोघांना एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.