पुणे – बांधकाम सुरू करायचे असेल तर त्यासंबंधीचे नियम महापालिकेने केले असून, “क्रेडाई’, “मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन’, “आर्किटेक्ट, इंजिनीअर्स अँड सर्वेअर असो.’ आणि “असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनीअर’ यांना ते कळवले आहेत. तसेच, या संबंधी बांधकाम व्यावसायिक आणि वरील संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक झाली त्यातही त्यांना हे नियम अवगत केले आहेत.
लॉकडाऊन काळात बांधकाम सुरू करताना काही नियम आणि अटींचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. त्यामध्ये कामगारांना कामाच्या ठिकाणी शिबिरामध्ये रहावे लागेल. साइटवर प्रवेश करणाऱ्याचे थर्मल स्कॅनिंग केले जावे. सर्व कामगारांची डायबेटिस आणि रक्त तपासणी करावी, कामगारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे नमूद केले आहे.
सर्व कामगारांना कामाच्या ठिकाणी येण्यापूर्वी, खाण्यापूर्वी, कामाच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी साबणाने हात धुवावेत, त्यासाठे योग्य ती व्यवस्था कामाच्या ठिकाणी करावी, सर्व कामगारांची जेवण्याची सोय कामाच्या ठिकाणी करावी, सर्व कामगारांना तोंड आणि नाक झाकण्यासाठी कापडी मास्क द्यावे. कामगारांच्या निवासाच्या ठिकाणी, शौचालये, कॅन्टीन, प्रवेशद्वार येथे दररोज स्वच्छता करावी आणि आठवड्यातून किमान दोनवेळा जंतुनाशकाची फवारणी करावी, हे नियमात स्पष्ट करण्यात आले आहे.