Sharad pawar : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर यंदा दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता.
परंतु बारामतीमधील गोविंदबागेत अजित पवार उपस्थित राहू शकलेले नाही. सध्या गोविंदबागेत अनेक नेतेमंडळी, कार्यकर्ते शरद पवार यांची भेट घेत आहे. नुकतेच शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या अनुपस्थितीवर त्यांनी भाष्य केले आहे. शरद पवार यांच्या बाजूला अजित पवार असते तर खूप आनंद झाला असता, असे प्रशांत जगताप म्हणाले. तसेच शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांच्या भेटीला सहयोग सोसायटीत जाणार नसल्याचेही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही वेळापूर्वीच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीकडे रवाना झाले आहेत.