मुंबई: मराठी चित्रपट आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राजु साप्ते यांनी त्रासाला कंटाळून आज आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तत्पूर्वी एक सुसाईड व्हिडिओही त्यांनी बनवला आहे. त्यानंतर, मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, यापुढे कलाकारांना त्रास दिल्यास हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच आहे, असा इशाराच खोपकर यांनी दिला आहे.
साप्तेंच्या निधनाच्या वृत्तानंतर मनसेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनचिसेचे अमय खोपकर यांनी युनियनच्या नेत्यांना इशाराच दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही.
राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर मनसेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन खोपकर यांनी केले आहे. तसेच, भविष्यात कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच समजा, असा थेट इशाराच खोपकर यांनी दिला आहे.
सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध कलाकाराने व्हिडिओ पोस्ट करुन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला, त्यामध्ये आत्महत्येचे कारण सांगितल आहे. लेबर युनियमधील राकेश मौर्य यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे साप्ते यांनी म्हटले आहे.