भाजपच्या गर्दीत बुडायला जाणार नाही

सराटी मेळाव्यात आप्पासाहेब जगदाळे यांचे प्रतिपादन

रेडा – सकाळपासून 20 तारखेला माझा भाजपात प्रवेश, अशी सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे. मात्र, ही पोस्ट खरी नाही. भाजपमध्ये पहिलीच गर्दी झाली आहे. या गर्दीत बुडायला जाणारा मी नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निष्ठावान असल्याने जागा सोडणार नाही. मात्र, येत्या विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून माझ्यासह अनेक जण इच्छुक आहेत. तालुक्‍यातील कामे मार्गी लागण्यासाठी दमदार आमदार हवा, असे प्रतिपादन इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केले.

सराटी (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे होते.

जगदाळे म्हणाले की, मी जागा सोडली नाही. कोणत्याही पक्षातल्या नेत्याला भेटायला गेलेलो नाही. परंतु तालुक्‍यातील कार्यकर्ता एकत्र राहिला पाहिजे, या भूमिकेतून मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा म्हणजे मला आमदार होण्यासाठी नाही. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना अपयश आले म्हणून आम्ही मनापासून खचून न जाता जनतेची कामे केली. इंदापूरचा आमदार हा जनतेच्या मनातील प्रश्‍न ओळखणारा असावा अधिकाऱ्यांवर वचक ठेवून जनतेचे प्रश्‍न निकाली काढणारा असावा.

भाजपचे चिन्ह कमळ माझ्या फोटोच्या पाठीशी टाकून सोशल मीडियामध्ये पोस्ट फिरत आहेत. मात्र, हे खोडसाळपणाने प्रक्रिया सुरू आहे. असे बोलून भाजपमध्ये जाणार नाही, अशी ग्वाही जगदाळे यांनी दिली. बाळासाहेब घोलप म्हणाले की, मी विधानसभेसाठी उमेदवारी पक्षाकडे मागितलेली नाही. त्यामुळे माझी भूमिका स्पष्टपणे मांडणारा कार्यकर्ता आहे. उमेदवारीबाबत ठोस निर्णय झाला पाहिजे. 2024 साठी उमेदवार म्हणून मी असणार आहे. यावेळी अशोक घोगरे, भाऊसाहेब सपकाळ, गणेशराव झगडे, किरण बोरा यांनी मनोगत व्यक्‍त केले.

यावेळी छत्रपती साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप, ज्येष्ठ नेते जगन्नाथ मोरे, अशोकराव घोगरे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे, कालिदास देवकर, किरण बोरा, अनिल बागल, भाऊसाहेब सपकाळ, गणेश झगडे, विजय निंबाळकर, अरविंद वाघ, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. अंबादास शेळके यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here