अतिवृष्टीचा साताऱ्यातील पर्यटन हंगामाला फटका 

ठोसेघर – सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना यंदा अतिवृष्टीचा फटका बसला. सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अतिवृष्टीमुळे अडथळे निर्माण झाल्याचा थेट परिणाम तेथील पर्यटन हंगामावर झाला आहे. यंदा ठोसेघर धबधब्याचे रमणीय दृश्‍य पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील ठोसेघर धबधबा, जागतिक वारस स्थळ असलेले कास पुष्प पठार, कास तलाव, नुकताच नावारूपाला आलेला देशातील सर्वात उंच भांबवलीचा वजराई धबधबा, बामणोलीचा शिवसागर जलाशय ही विलोभनीय पर्यटन स्थळे आसपासच्या जिल्ह्यांसह परराज्यातील आणि परदेशी पर्यटकांना भुरळ घालतात. दरवर्षी वर्षा ऋतुतील पर्यटन हंगामात हजारोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात; परंतु यंदा सातारा, सांगली कोल्हापूरसह इतर बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. ऐन पर्यटन हंगामात ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला होता.

कास, भांबवली, बामणोलीकडे जाणाऱ्या मार्गावरही वारंवार अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे काही दिवस या ठिकाणांवर जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. याचा परिणाम पर्यटन हंगामावर झाला आहे. मागील वर्षीच्या पर्यटन हंगामात ठोसेघर धबधब्याला तब्बल एक लाख 61 हजार 115 पर्यटकांनी भेट दिली होती; परंतु यंदाच्या हंगामात पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचे चित्र आहे.

यंदाच्या हंगामात 15 सप्टेंबरपर्यंत फक्‍त 28 हजार 103 पर्यटक ठोसेघर धबधब्यावर येऊन गेल्याचे तेथून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. अशीच काहीशी परिस्थिती भांबवलीच्या वजराई धबधब्यावरील पर्यटनाची आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून ठोसेघर, कास, बामणोली मार्गावरांवरील अडथळेही दॅर करण्यात आले आहेत. कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाल्याने उर्वरित हंगामात पर्यटनास बहर येण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here