नवी दिल्ली – गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची पोलीस बंदोबस्तात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुलेआम हत्या केली. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशी हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये ही सर्व घटना घडली. यानंतर तिन्ही आरोपींनी आत्मसमर्पण केले. या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अजूनही पुढे आले नाही. दरम्यान, ‘आपला एन्काऊंट होईल किंवा पोलीस मारतील…’ अशी भविष्यवाणी स्वतः अतिकने 19 वर्षांपूर्वीच केली होती.
2004 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान अतिक अहमदने त्याच्या मृत्यूबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. “एन्काऊंटर होईल किंवा पोलीस मारतील किंवा मग आमच्याच समाजातील एखादा वेडा माणूस जीव घेईल. मी रस्त्याच्या कडेला पडलेला भेटेन…’ असं तो म्हणाला होता.
अतिक अहमदने 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत फुलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा दावा केला होता. त्याने ही निवडणूक जिंकली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अतिकने त्याच्या मृत्यूविषयी भिती व्यक्त केली होती. मात्र, तब्बल 19 वर्षांनंतर अखेर त्याची ही भीत खरी ठरल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्येमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.