मनसेने घेतली संजय राऊतांची फिरकी
मुंबई : मी दाऊद इब्राहिमला दम दिला आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यांच्यावर उपहासात्मक टीका होताना दिसत आहे. यावरुनच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी उपरोधक टोला लगावात राऊतांची फिरकी घेतली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी गेलेलो तेव्हा माझी गाडी फोडली या राऊतांच्या वक्तव्यालाही देशपांडे यांनी उत्तर दिले आहे.
मी ओसामा बिन लादेन शी बोललो होतो आणि त्याला 9/11 नंतर दम पण दिला होता. आणी हो ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती त्यांचा आम्हाला अभिमान आहे .आमच्या”दिलदार राजाकडून “तुम्ही नवी कोरी गाडी देखील घेतली होती #फेकाडासामनेवाला
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 16, 2020
पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात राऊतांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले. यावेळेस पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना संजय राऊतांनी दाऊद इब्राहिमविषयी केलेल्या वक्तव्यावरुन देशपांडे यांनी ट्विटवरुन त्यांची फिरकी घेतली आहे. मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो आणि त्याला 9/11 नंतर दम पण दिला होता, असे देशपांडे यांनी ट्विट केले आहे. याशिवाय भाजपाचे नेते निलेश राणे यांनाही राऊतांचे दाऊदला दम देणारे वक्तव्य म्हणजे चांगला विनोद आहे असा टोला ट्विटवरुन लगावला आहे. याच कार्यक्रमामध्ये राऊत यांना राज ठाकरे तसेच मनसे आणि भाजपा एकत्र येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस बोलताना राऊतांनी, राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. ते शिवसेना सोडून गेले तेव्हा मी त्यांची समजूत काढण्यासाठी गेलो होतो. मात्र त्यावेळी काहीजणांना राग आला. त्यांनी मला विरोध केला. राज यांच्या घराखाली माझी गाडी फोडली,असे सांगितले.
राऊत यांनी मनसैनिकांनी गाडी फोड्याची आठवण करुन दिल्यानंतर देशपांडे यांनी यावरुनही राऊतांना सुनावले आहे. ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती त्यांचा आम्हाला अभिमान आहे .आमच्या दिलदार राजाकडून तुम्ही नवी कोरी गाडी देखील घेतली होती,अशी आठवण देशपांडे यांनी राऊतांना करुन दिली आहे. याच ट्विटच्या शेवटी देशपांडे यांनी #फेकाडासामनेवाला हा हॅशटॅगही वापरला आहे.