मी आता राजीनामा देतो, फेरमतदान घ्या

उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान, ईव्हीएम मशीनबाबत पुन्हा टीका

सातारा – “देशभरातील 376 मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनमधील मतांच्या आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान व मतमोजणी यांच्यामध्ये चक्‍क 672 मतांचा फरक आहे. मी आता राजीनामा देतो, या मतदारसंघात फेरमतदान घ्या, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. ईव्हीएम मशीनवरून होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ईव्हीएम मशीनच्या वैधतेबाबत कायदेपंडितांनी जी ठामपणे विधाने केली ती कोणत्या आधारावर केली, असे विचारून ते म्हणाले, “”क्विंट नावाच्या माध्यमाने प्रत्यक्ष मतदान व निवडणुकीनंतर आलेली आकडेवारी यातील तफावत दाखवली, तेव्हा ती आकडेवारी निवडणूक आयोगाने तत्काळ वेबसाईटवरून हटविली. निवडणूक जनतेच्या पैशावर होते त्याची उधळपट्टी करण्याचा अधिकार कोणाला नाही. एक हजार मते मोजणाऱ्या एका ईव्हीएम मशीनची किंमत तेहतीस हजार म्हणजे एका मताची किंमत 1 रूपये 30 पैसे. आणि बॅलेट पेपरने निवडणूक घेतल्यास अवघा तेराशे रुपये खर्च. ईव्हीएम मशीनवर तब्बल 4555 कोटी रूपये खर्च झाला.

”ईव्हीएम मशीन निर्वेध होत्या, तर मग सहा विधानसभा मतदारसंघात 672 मतांचा फरक कसा पडला, असा सवाल उदयनराजे यांनी केला. वाई मतदारसंघात 344, कोरेगाव मतदारसंघात 5, कराड उत्तर मतदारसंघात 148, कराड दक्षिणमध्ये 5, पाटण मतदारसंघात 97, सातारा विधानसभा मतदारसंघात 75 अशा 672 मतांचा फरक पडल्याचे उदयनराजे भोसले यांनी कागदपत्रांच्या आकडेवारीवरून दाखवून दिले. सातारा लोकसभा मतदारसंघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखाचे मताधिक्‍य आहे असा दावा उदयनराजे यांनी करून “मी राजीनामा देतो पुन्हा फेरमतदान होऊ दे. तितक्‍याच मताधिक्‍याने निवडून येईन, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाची बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का, असा सवाल त्यांनी केला. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्‍यात आल्याचा आरोप करत त्यांनी ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती उखडून टाकायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विषयावर दाद मागणाऱ्यालाच कारवाईची भाषा वापरली जाते, हे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

उदयनराजे कधी रडीचा डाव खेळत नाही, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या यंत्रणेपेक्षा राजेशाही काय वाईट होती? या प्रकाराला वेळीच पायबंद घातला नाही तर 1857 च्या बंडाप्रमाणे सर्वत्र रक्तपात होऊन सारी व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)