यंदा कमी वेळेत होणार विठ्ठल दर्शन

पुणे – आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातील लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. त्यांना कमीत-कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने विठ्ठल आणि रुक्‍मिणी मंदिरात एकाचवेळी पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विधानभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज दोन्ही पालखी 11 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार असून, 12 जुलै रोजी आषाढी एकादशीनिनित्त राज्यातील लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पालखी मार्ग, पालखी तळ तसेच पंढरपूर येथे डॉ. म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पालखी मार्गावर मुक्काम आणि विसाव्याच्या सर्व दिंड्यांना मोफत वीज पुरवठा दिला जाणार असून, वारकऱ्यांनी आकडे टाकून वीज घेऊ नये, स्वयंपाकासाठी धान्य, रॉकेल व गॅसपुरवठा केला जाणार आहे. पाणी पुरवठ्यासाठी टॅंकरची व्यवस्था करण्यात आली आहे. वारीदरम्यान स्वच्छतेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ व कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून सुमारे 30 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.