अहमदाबाद – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे आपले पद सोडणार असल्याचे वृत्त सातत्याने पसरले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर द्रविड यांनी अद्याप असा कोणताही विचार नाही असे सांगत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
रवी शास्त्री यांच्यानंतर द्रविड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपादी जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच त्यांचा करार रविवारी पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंतच होता. त्यानंतर हा करार वाढवण्यास खुद्द द्रविडही तयार नाहीत, असे संकेत मिळत होते. मात्र, त्यावर बीसीसीआय तसेच द्रविड यांच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नव्हता. मात्र, रविवारचा सामना संपल्यावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत द्रविड यांनीच हा खुलासा केला व ही चर्चा थांबवली.
माझा करार कधी संपणार किंवा मी तो पुन्हा वाढवणार का याबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. आत्ता तर स्पर्धा संपली आहे. आता येत्या काळात याबाबतीत विचार करायला वेळ मिळेल. मात्र, सध्या काही काळ कुटुंबासह व्यतीत करणार आहे, असेही द्रविड यांनी म्हटले आहे.
विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघ पराभूत झाला व विश्वविजयाचे स्वप्न भंग झाले. मात्र, आमचा संघ अत्यंत सातत्यपूर्ण खेळ करत होता. सलग 10 सामने जिंकत आम्ही अंतिम फेरी गाठली होती. केवळ एका पराभवामुळे लगेचच खेळाडूंवर टीका करणे योग्य नाही. काही चुका घडल्या व त्या आमच्या लक्षातही आल्या. असाच चुकांमधून प्रत्येक खेळाडू शिकत असतो.
आता संघात वरिष्ठ व नवोदित असा सुरेख समतोल बनलेला आहे. त्यामुळे हाच संघ पुढील काळात सातत्याने यश मिळवताना दिसेल. यंदा आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरीही पुढील काळात होत असलेल्या स्पर्धेत आम्ही निश्चितच ही उणिव भरून काढू, असा विश्वासही द्रविड यांनी व्यक्त केला.
नेतृत्व रोहितकडेच राहावे
रोहित शर्माकडून नेतृत्व काढून घेतले जाणार या चर्चेनेही जोर धरला होता. मात्र, द्रविड यांनी असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. रोहित संघाचे नेतृत्व अत्यंत सक्षमपणे करत आहे. एक पराभव झाला की लगेच कर्णधारवरील विश्वास घालवणे कीतपत योग्य आहे. उलट रोहितकडेच पुढील किमान दोन वर्षे नेतृत्व राहिले तर एक नवी संघबांधणी प्रक्रिया राबवता येणार आहे. त्याचा अनुभव नवोदितांसाठी अत्यंत महत्वाचा ठरेल, असेही द्रविड म्हणाले.