मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मकाऊ कसिनोमधील एक फोटो ट्विट केला आणि एकच खळबळ उडाली. या फोटोनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे.राऊत (Sanjay raut twitt) यांनी केलेल्या ट्विटमध्ये थेट नाव घेणं टाळलं असलं तरी हा फोटो भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांचा असल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली. राऊतांनी पोस्ट केलेल्या या फोटोबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर दोन फोटो ट्वीट केले आहेत. त्यावर,“महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा.. ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…”असे एका फोटोवर म्हटले आहे.तर दुसरा फोटो शेअर करत, “१९ नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असा खोचक टोला देखील यावेळी संजय राऊतांनी लगावला आहे. (Bawankule casino viral photo)
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं” असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. माध्यमांशी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले,”चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं. संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे बावनकुळे, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. इतकी निराशा योग्य नाही” असं स्पष्ट मत यावेळी फडणवीसांनी व्यक्त केलं.
“व्यक्तिगतपणे लक्ष्य केलं जात आहे यापेक्षा खालची पातळी काय असू शकते. ते असे मॉर्फ केलेले फोटो, कापलेले फोटो पोस्ट करून वाईट आरोप करत आहेत. हे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
बावनकुळेंनी दिल स्पष्टीकरण
संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर बावनकुळेंनी देखील आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून याबाबत खुलासा केला आहे. बावनकुळे म्हणतात,”मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे” (Bawankule on sanjay raut)