ह्युस्टन – लॉरा हे चक्रिवादळ आज सकाळी अमेरिकेच्या दक्षिण पश्चिमेकडील ल्युसियानाच्या किनारपट्टीवर धडकले. चक्रिवादळाची तीव्रता पाहता त्याची श्रेणी 4 इतकी वाढली असल्याने अधिकाऱ्यांनी मोठ्या संभाव्य हानीचा इशारा दिला आहे.
या वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी 240 किलोमीटर इतका झाला होता. त्यामुळे सोसाट्याचे वारे आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ ल्युसियाना आणि टेक्सासच्या किनारपट्टीकडे घोंघावत असून लवकरच त्याचे रुपांतर श्रेणी 5 मध्ये होईल. किनाऱ्यावर थडकले त्यापेक्षाही त्याची ताकद खूप वाढलेली असेल. त्यावेळी त्या वाऱ्यामुळे वाहने देखील उडून जाऊ शकतील, असे या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे.
किनाऱ्याजवळील भूभागाला या चक्रिवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. लॉरा चक्रिवादळामुळे उत्तरेकडील टोकाला आणि पूर्वेकडील अर्कान्सास आणि ओहिओ, टेन्नेसी खोऱ्यालाही मोठ्या प्रमाणात फटका बसयाची शक्यता आहे. या तडाख्यातून केवळ ह्युस्टन शहर बचावण्याची शक्यता आहे.
टेक्सासमध्ये 4 लाख नागरिकांना किनारपट्टीच्या गलवेस्टोन, ब्युमोंट आणि पोर्ट आर्थर भागातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर दक्षिण ल्युसियानामधील कॅल्कॅसिओ आणि कॅमेरोनमधील 2 लाख नागरिकांना हलवले गेले आहे.