ओतूर (पुणे) – अष्टविनायक तीर्थक्षेत्रातील एक असलेल्या व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील ओझरच्या श्री विघ्नहर गणपती मंदिरात दिड किलो वजनाची सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री आणि दानपेटीमधील रक्कम 27 जुलैला चोरीस गेली होती. याचा तपास महिनाभरात लावण्यास पोलिसांना यश आले आहे.
चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी श्वानपथक, हस्तरेषा तज्ज्ञ यांना पाचारण केले होते. ओझर गणपती मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये या चोरीचा प्रकार कैद झाला होता. यामध्ये दोघे चोरी करताना दिसत होते; मात्र हे दोघे कोण? हा सवाल सर्वत्र भेडसावणारा असतानाच याचा पोलिसांना तपास लावायचा हे एक आव्हान होते; मात्र हा तपास लागल. यामुळे गणेश भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले की, आळेफाटा पोलिसांकडून संदीप सखाराम पतवे व विठ्ठल महादू पतवे (रा. कळस खुर्द, ता. अकोले, जि. अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करून तपास केला असता त्यांनी ओझर येथील गणपती मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून मंदिरात चोरी करण्यासाठी मदत केलेल्या लक्ष्मण विठ्ठल पतवे, अविनाश पांडुरंग सावंत (रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर) या दोघांची नावे सांगितलेली आहेत. 1500 रुपयांची रोकड आणि मंदिरातील चांदीची छत्री चेपवलेल्या अवस्थेत आरोपींच्या राहत्या घरी लपवलेले निष्पन्न झाले. हा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
आरोपींनी चोरी करण्यासाठी वापरलेली कटावणी, स्क्रू चावी, बॅटरी, स्पॅनर, टॅमी, कोयता व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. लवकरच उर्वरीत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात असतील.
-दीपाली खन्ना, उपविभागीय पोलीस अधिकारी