राजगुरूनगर (पुणे) – येथील बाजार समितीच्या आवारातील भर वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेतील तब्बल सहा कर्मचारी करोना बाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे.
बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांमध्ये धाकधूक वाढली आहे. करोना विषाणू संसर्ग देशात सुरु होताच येथील स्टेट बॅंकेतील अधिकाऱ्यांनी स्वतःबरोबर ग्राहकांची काळजी घेतली होती. बॅंकेत सोशल डिस्टंसला जादा महत्व दिले होते तरीही काही ग्राहकांचा आणि बॅंकेतील कर्मचाऱ्यांचा कुठेतरी संपर्क आल्याने करोनाने बॅंकेत शिरकाव करीत सहा अधिकाऱ्याना बाधित केले. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले अनेक ग्राहकांमध्ये धास्ती वाढली आहे. ग्राहकांना सेवा देण्यासाठी बॅंकेतील एक अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहुन व्यवस्थापन सांभाळले आहे. बॅंकेचा कारभार बंद ठेवायचा की व्यवहार सुरू ठेवण्याबाबतचे मार्गदर्शन बॅंकेच्या वतीने प्रांत आणि तहसीलदार कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.
खेड बाजार समितीच्या आवारात बॅंकेसमोरच भाजीपाला मार्केट दिवसभर सुरु असते.शासकीय चलने भरणा याच बॅंकेत असतात. दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहकांच्या संपर्कातील सहा कर्मचारीच करोनाबाधित निघाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या बॅंकेशी निगडित असलेल्या शहरातील इतर बॅंकेच्या अधिकारी आणि कर्मचारी खबरदारी म्हूणन होम क्वारंटाइन झाले आहेत. भारतीय स्टेट बॅंकेशी निगडीत व्यवहार करताना संपर्कातील सर्व ग्राहकांनी न घाबरता स्वतः हुन विलगीकरण राहुन काळजी घ्यावी. तसेच आरोग्य यत्रंणेशी संपर्क करुन सल्ला घेऊन, लक्षणे आढळून येत असेल तर त्वरीत करोना चाचणी करुन घ्यावी.असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केल्या आहेत.