लोणंद -मिरज-पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि रेल्वे स्थानकांचे विस्तारीकरण सध्या वेगाने सुरू आहे. सध्या पुणे ते मिरज दरम्यान असणाऱ्या रेल्वेमार्ग परिसरातील व रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणे काढण्याचा सपाटा मध्य रेल्वेकडून लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काल (दि. 26) लोणंद येथील शास्त्री चौकाच्या पूर्व भागातील रेल्वेच्या जागेतील शंभर अनधिकृत घरे रेल्वेकडून जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. या विस्थापितांना शिवसेनेच्या विश्वास शिरतोडे यांनी स्वत:ची एक एकर जागा तात्पुरती दिली आहे.
लोणंद जंक्शन येथे मध्य रेल्वेकडून सध्या विस्तारीकरण सुरू आहे. लोकोशेड उभारण्यासाठी शास्त्री चौकाच्या पूर्वेकडील वडार, डोंबारी, घिसाडी, गोपाळ समाजबांधवांच्या घरांवर यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सध्याची नोटिसीची अंतीम मुदत संपल्यानंतर
थेट घरे पाडण्यास सुरुवात करण्यात येणार होती. म्हणून अनेकांनी आठ दिवस आधीच संसारोपयोगी साहित्य हलवण्यास सुरवात केली होती. हे अतिक्रमण रेल्वेच्या अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत शांततेत काढण्यात आले.
यापूर्वी 2018 साली रेल्वेकडून लोणंद रेल्वेस्टेशनच्या बाजूला नवीन पॉवर स्टेशनसाठी रेल्वेच्या हद्दीत दक्षिणेला असलेल्या बेघर वस्ती, आंबेडकर वसाहत, रोटरी गार्डन शेजारील झोपडपट्टी, बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनच्या मध्ये असलेली झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यावेळी अडीचशे कुटुंबे विस्थापित झाली होती. यावेळी शंभर कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
तात्पुरता निवारा
शंभर कुटुंबे एकाच वेळी बेघर होणार असल्याने आठवडाभरापासून अनेक जण लोणंदमधे कमी भाड्यात मिळतील अशी घरे शोधत फिरत होते. हाताच्या बोटांवर मोजता येतील अशांना भाड्याची घरे मिळाली. मात्र, बहुतांश लोकांना पावसाळ्याच्या तोंडावर आसरा न मिळल्याने काहींनी फलटण रोडवरील ओढ्यालगत तर काहींनी सईबाई हौसिंग सोसायटीच्या पूर्वेस कापडगाव रोडवर आपला तात्पुरता निवारा उभारला आहे.
विश्वास शिरतोडेंचे दातृत्व
लोणंदमधील शिवसेना नेते विश्वास सदाशिव शिरतोडे यांनी दातृत्व या विस्थापितांना दाखवत स्वतःच्या एक एकर जागेत तातपुरता निवारा उभारण्यास परवानगी देऊन ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे अनेकांचा जागेचा प्रश्न काही काळासाठी सुटलेला आहे. या ठिकाणी नगरपंचायतीने या विस्थापितांना स्वच्छतागृहे, पाणी व विजेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिरतोडे यांनी केली आहे.