पुणे – कोरोना व्हायरसमुळे जगभर महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशांतर्गत सर्व व्यवहार, उद्योगधंदे व वाहतूक पूर्णपणे बंद आहे. अशावेळी अनेक कुटुंबावरती आर्थिक व दैनंदिन संकट ओढावले आहे. या काळात मोशी येथील संतोष सिताराम बारणे सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांची मदत करत आहेत.
बांधकाम व्यवसायिक डॉ. संतोष बारणे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. करोना व्हायरसमुळे देशभरातील लॉक डाऊन कालावधीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला. शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतात मात्र आदिवासी व ग्रामीण भागामधील मागासलेल्या लोकांसाठी बारणे यांनी स्वतः ऍम्ब्युलन्स व डॉक्टरांची एक टीम सोबत घेऊन मोफत आरोग्याची तपासणी केली.
रक्तदान शिबिर
लॉकडाऊन कालावधीमध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा भासत होता. याच काळात बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यामध्ये साधारण 2500 ते 3000 लोकांनी सहभाग घेतला.
पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
कोरोना सारख्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये स्वतः च्या आरोग्याची काळजी न करता जनतेसाठी दक्ष राहणाऱ्या पोलिसांसाठी बारणे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबिवले. यामध्ये नागरिकासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. यात शहरातील नामवंत हॉस्पिटलचे पथक सोबत घेऊन हे शिबीर यशस्वी राबवली आहे.
लॉकडाऊन काळात महिलासाठी सॅनिटरी पॅडचे वाटप
लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नव्हते. विशेषता महिला वर्गासाठी त्यांच्या आरोग्याचा विचार करता यामध्ये प्रामुख्याने मजूर महिलांना मोफत पॅडचे वाटप करून त्यांच्या मासिक अडचणीच्या काळामध्ये गरज ओळखून बारणे यांच्या वतीने पॅडचे वाटप करण्यात आले.
तृतीयपंथी लोकांना धान्य वाटप
लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नाही. शहरातील मार्केट मधील सर्व दुकाने बंद आहेत. कामधंदा नसल्यामुळे लोकांना आर्थिक टंचाई जाणवत असताना शहरातील तृतीयपंथी लोकांसाठी बारणे यांनी पुढाकार घेत धान्य वाटप करून वेगळा संदेश दिला आहे.
प्राण्यांच्या व जनावरांच्या चाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली
संचारबंदी असल्याने लोकांच्या दैनंदिन जेवणासाठी अनेक पालिकेसह वैयक्तिक लोकांनी अन्नदान देवून योगदान दिले. परंतु मुक्या, भटक्या प्राणी व जनावरांच्या अन्नाची सोय करण्याचे वेगळं पुण्य बारणे यांच्यावतीने करण्यात आले. यामध्ये त्यांनी मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांना विशेषता कुत्र्यांना बिस्किटे व पाणी उपलब्ध करून दिले तर जनावरांना चारा उपलब्ध करून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
गेली 50 दिवसापासून सर्वत्र लॉकडाऊन आहे. शहरी भागातील सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे हाताला काम नाही. तर आदिवासी व ग्रामीण भागांमध्ये वाहतूक दळणवळण ठप्प असल्यामुळे अन्नधान्याचा
तुटवडा निर्माण झाला आहे. या काळात आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरातील अतिशय दुर्गम भागात 12 ते 15 ग्रामपंचायत परिसरात लोकांसाठी बारणे यांनी अन्नधान्य वितरण केले. यात सुमारे 3500 ते 4000 कुटुबाच्या उदरनिर्वाहाची सोय करण्यात आली. याचबरोबर त्यांनी त्या दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी ही मोफत करुन दिली आहेत.
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या माणुसकीच्या नियमानुसार समाजातील वंचित घटकांसाठी निस्वार्थीपणे काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो, अशी भावना संतोष बारणे यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील विशेषत ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक लोकांना व महिलांना मोठ्या शस्त्रक्रिया (कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, हृदयाला होल असणे) करण्यासाठी रुग्णांना घरातुन मोठ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून पुन्हा घरी सोडण्यापर्यंतचे संपूर्ण दायित्व आम्ही स्वीकारतो. यापूर्वी अशा अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत व यापुढेही करत राहणार आहोत. त्याच बरोबर 15 मे 2020 हा जागतिक फॅमिली दिवस म्हणून साजरा केला जातो. कोरोना महामारी च्या संकटातून सर्वांनी आपापल्या कुटुंबांना (फॅमिली) सुरक्षित ठेवावे, असे आवाहन संतोष बारणे यांनी केले आहे.