तळेगाव ढमढेरे -येथील गावातील युवकांची करोना साथरोग सहाय्यक सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांच्याकडे गावातील बाहेर जाणाऱ्या-येणाऱ्यांची नोंद राहून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणार असल्याची माहिती करोना नियंत्रण कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भराटे यांनी दिली. जवळपास 50 स्वयंसेवकांचा संघ गावामधे शुक्रवार (दि. 15) पासून कार्यरत असणार आहे.
या सर्वांना गावकऱ्यांनी सहकार्य करून साथ द्यावी व विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने बाहेरगावावरून आलेल्या लोकांची घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येत असून त्यांचे तापमान, सर्दी, खोकला याची तपासणी करून त्यांच्या हातावर 14 दिवस होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जात आहे.
तर आरोग्य विभागाकडून परिसरात बारकाइने निरीक्षण सुरू आहे. तब्बल सहा दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वी गावात सापडलेल्या तिन्ही करोनाबाधित रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.