मुंबई : मुंबईत राज्याच्या दुप्पट कोरोनाची रुग्ण संख्या झाली आहे. रोज झपाट्याने इथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील 80 टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी ठेवावेत अशी शिफारस टास्क फोर्सने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने मुंबईतील कोरोनाचे वाढते रुग्ण त्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासाठी डॉ.संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला आहे.
मुंबईत सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालय मिळून एकूण 30 हजार बेड आहेत. त्यातील 80 टक्के बेड म्हणजे 22 हजार हे फक्त कोविड रुग्णांसाठी ठेवावे अशी शिफारस आहे. टास्क फोर्समधील काही सदस्यांच्या मते 60 टक्के बेड जरी कोविड रुग्णांसाठी दिले तरी चालेल असे देखील म्हटले. त्यामुळे 60 ते 80 टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी असावेत. तसेच ह्या बेड मधील 20 टक्के बेड अन्य रुग्णांना देण्याचे अधिकार हे सरकारकडे असावेत अशीही शिफारस केलेली आहे.
सध्या अनेक रुग्ण बेड मिळत नसल्याची तक्रार करतात त्यामुळे राज्य सरकारकडे बेड देण्याचे अधिकार असावेत, असे टास्क फोर्सने म्हटले आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे रुग्णालय ही पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, अशी माहिती टास्क फोर्सने दिली आहे . अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची शिफारस ही टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच आयुर्वेदिक टास्क फोर्स नेमण्याची ही शिफारस मुख्यमंत्र्यांना केली आहे. ही मागणी मान्य झाली आहे.