नवी दिल्ली – करोना बाधितांना तात्काळ उपचार देण्यासाठी सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालये जीव ओतून सेवा देत आहेत. मात्र, काही खासगी रुग्णालये बाधितांवर उपचार करून जादा बिल आकारात असून रुग्णांसोबत दुर्व्यवहार करण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशातच दुबईच्या एका हॉस्पिटलने उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. दुबईच्या हॉस्पिटलने एका करोनाबाधित भारतीय कामगारांचे तब्बल १.५२ कोटींचे बिल माफ केले आहे.
ओडाला राजेश असे त्या भारतीय कामगारांचे नाव असून ते ४२ वर्षांचे आहेत. ते मूळ भारतीय असून तेलंगणाचे रहिवासी आहेत. ओडाला राजेश दुबईमध्ये कामानिमित्त वास्तव्यास होते. यादरम्यान त्यांना करोना झाल्याने २३ एप्रिल रोजी दुबईतील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. हे रुग्णालय दुबईच्या आरोग्य आणि वैद्यकीय सेवा विभागाचा एक भाग असून आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ओडाला राजेश येथे ८० दिवस ऍडमिट होते.
करोनामुक्त झाल्यानंतर ओडाला राजेश यांना हॉस्पिटलने 7,62,555 दिरहमचे बिल हातात दिले. याची भारतीय चलनात रक्कम तब्बल १.५२ कोटी होते. हे पाहून ओडाला राजेश यांना धक्काच बसला. मजूर म्हणून काम करणाऱ्या राजेश एवढे बिल देण्यास सक्षम नव्हते. याप्रकरणी दुबईस्थित गल्फ वर्कर्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष गुंडेल्ली नरसिम्हा यांनी भारतीय वाणिज्य दूतावासशी संपर्क साधला.
भारतीय वाणिज्य दूतावासने दुबईच्या हॉस्पिटल प्रशासनाने पत्र लिहीत माणुसकीच्या नात्याने गरीब कामगाराची मदत करण्याचे आवाहन केले. यावर हॉस्पिटलनेही मोठ्या मनाने ओडाला राजेश यांचे १.५२ कोटींचे बिल माफ केले. इतकेच नव्हेतर तेथील भारतीय स्वयंसेवकांनी ओडाला राजेश आणि त्यांचे सहकारी डी. कन्कैया यांना भारतात परतण्याची व्यवस्था केली. तसेच खर्चासाठी १० हजार रुपयेही दिले.