डॉक्टरचा एनआयव्हीचा अहवालही पॉझेटीव्ह : सर्व रस्ते केले पूर्णपणे बंद
शिक्रापूर- येथील एका डॉक्टरला करोनाची लागण झाल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. तर या करोना बाधित डॉक्टरचा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा (एनआयव्ही) अहवाल येणे बाकी असताना तो अहवाल देखील पॉझेटीव्ह आला असून शिक्रापूर परिसरातील 144 जणांना “होम क्वारंटाइन’ करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर येथील एका सोनोग्राफी सेंटरमधील डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरला भेट देऊन तपासणी करीत सोनोग्राफी सेंटर सील केले असून परिसरात फवारणी करण्यास सुरूवात केली आहे. तसेच शिक्रापूर परिसरातील सर्व रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहे, तर मंगळवारी (दि. 14) शिक्रापूर येथे शिरूर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, तलाठी अविनाश नलावडे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे, कृषी सहाय्यक अशोक जाधव यांनी शिक्रापूर येथे बैठक घेत शिक्रापूर गावातील प्रत्येक ठिकाणचे रस्ते पूर्णपणे बंद करून गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची व सर्व वाहनांची नोंद करत त्या वाहनांवर फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, प्रभारी सरपंच भगवान वाबळे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, माजी उपसरपंच आबाराजे मांढरे, दत्तात्रय गिलबिले, ग्रामपंचायत सदस्य निलेश थोरात, संतोष भुजबळ उपस्थित होते.
- शिक्रापूरसह परिसरातील आजूबाजूच्या गावातील या सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या अन्य सर्व 144 नागरिकांची यादी तयार करून त्या सर्व नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आले आहे. नागरिकांच्या तपासण्या करीत गावातील सर्व घरांचा सर्वे करून नागरिकांची माहिती घेण्यासाठी गरज पडल्यास परिसरातील शिक्षक देखील आरोग्य सेवकांच्या मदतीला देणार आहे.
– बाळासाहेब ढवळे-पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी - शिक्रापूर येथे करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार अशोक पवार व आमदार रोहित पवार हे वारंवार येथील घडामोडींचा आढावा घेत असून, प्रशासकीय अधिकारी देखील योग्य खबरदारी घेत आहे. करोनाच्या संकटावर आपल्याला मात करायची आहे; मात्र नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे.
– कुसुम मांढरे, सदस्या, जिल्हा परिषद - मास्क न लावल्याऱ्या बारा जणांवर गुन्हे
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर शिक्रापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच मास्क न लावता फिरणाऱ्या 12 जणांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहे. शिक्रापूर येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत अनेकांची वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहे. तर काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर उठाबशा काढण्याची शिक्षा पोलिसांनी केली आहे. - वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट
शिक्रापूर येथील डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि मंगळवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मिना, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्रापूर येथे भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला योग्य सूचना केल्या आहेत.