वीसगाव खोरे (वार्ताहर) – हिर्डोशी (ता. भोर) येथील वडिलांचे छत्र हरविलेल्या २३ वर्षीय युवकाचे अकस्मात निधन झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचे संकट कोसळले. या कुटुंबाला हिरडस मावळातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत सोशल मिडियावर एकत्र येत ७५ हजार ४१२ रुपयांची आर्थिक मदत करून एक मदतीचा हात दिला आहे.
कै.आशिष दिलीप मालुसरे (रा. टाकीचा माळ, हिर्डोशी) याचे २ एप्रिल रोजी अकस्मात निधन झाले. मुळातच वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्याने आई दिपाली हिने घराची सर्व जबाबदारी सांभाळत व कष्ट करून दोन्ही मुलांचे संगोपन केले. नुकताच मोठा मुलगा आशिष कमवता झाला होता. त्यामुळे आईला आता चांगले दिवस येतील असे वाटत असतानाच दुर्देवी घटना घडली आणि होत्याच नव्हत झाले.
हाताशी आलेला आशिषच्या अचानक जाण्याने आईला सावरणे अवघड झाले. लहान मुलगा शिक्षण घेत आहे. या दुःखातून सावरणे आणि पुन्हा कष्ट करत दुसऱ्र्या मुलाला घडवणे त्या मातेला अवघड झाले आहे. यातूनच सामाजिक बांधिलकी जपत काही तरुणांनी मदत करण्याचे ठरवले. व्हाट्सअप ग्रुप काढून त्यात हिरडस मावळातील व इतर ओळखीच्या अशा २९० जणांना सामिल करुन मदतीचे आवाहन केले.
मग या ग्रुमधील सदस्यांनी ज्याला शक्य होईल त्यापरीने मदतीचा देण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच जमा झालेले ७५ हजार ४१२ रुपयांपैकी कै. आशिष याच्या आईच्या नावे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा आपटी ता. भोर येथे ६० हजार रुपये मुदत ठेव ठेवण्यात आली. तर उर्वरित रक्कम रोख स्वरुपात कुंटुंबाकडे जमा केली. तरुणांकडून केलेल्या मदतीचे हिरडस मावळातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.