बारामती ( प्रतिनिधी) : पुणे ग्रामीण पोलिस दल अधिक कार्यक्षम होण्यासाठी,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बऱ्हाणपूर (ता.बारामती) येथे पोलीस दलाच्या स्वतःच्या जागेत पोलीस उपमुख्यालय निर्मिती करिता महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज शासकीय मान्यता दिली आहे.
बारामती तालुक्यात राजकीय शैक्षणिक औद्योगिक व इतर कारणांमुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असणारा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त इतर ठिकाणाहून मागावा लागतो. जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोहोचेपर्यंत विलंब होतो. याच दरम्यान काही अघटीत घडल्यास उपलब्ध मनुष्यबळावर त्याचा विपरीत परिणाम होतो. याकरिता बराणपुर तालुका बारामती येथे पोलीस मुख्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी होता. त्यानुसार पोलीस उप मुख्यालय निर्माण करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली आहे.
उपमुख्यालय याचे क्षेत्र सीमा घोषित करण्याबाबत सूचना यथावकाश निर्गमित करण्यात येणार आहे. आवश्यक पदनिर्मिती बाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.