“द रॉक’मधील अभिनेता ड्वेन जॉन्सन याला करोनाची लागण झाली आहे. ड्वेन जॉन्सन हा सध्याच्या घडीला जगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. 48 वर्षीय ड्वेन, त्याची 35 वर्षीय पत्नी लॉरेन आणि त्यांच्या मुली जास्मीन (वय वर्षे चार) आणि टियाना (वय वर्षे दोन) यांना सुमारे अडीच आठवड्यांपूर्वी विषाणूचा संसर्ग झाला होता.
अगदी जवळच्या कौटुंबिक मित्रांकडून आम्हाला संसर्ग झाला, असा अंदाज रॉकने वर्तवला आहे. मात्र तो कधी आणि कसा झाला, याची काहीच कल्पना नसल्याचे त्याने सांगितले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचेही जॉन्सनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले.
कोविड संसर्ग होणे ही गंभीर जखमा बऱ्या होणे किंवा संपत्तीतून बेदखल केले जाणे किंवा कफल्लक होण्यापेक्षा खूप वेगळी गोष्ट आहे, म्हणजे इतर गोष्टी मी बरेच वेळा अनुभवल्या आहेत. पण माझ्या कुटुंबाचे संरक्षण करणे, यालाच माझे प्राधान्य असते, असेही ड्वेनने भावूक होत सांगितले. ड्वेन जॉन्सनने आपले वडील रॉकी याच्या पावलावर पाऊल ठेवत व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून नाव कमावले आणि तो डब्ल्यूडब्ल्यूई स्टार झाला.
त्यानंतर “डब्ल्यूडब्ल्यूई’ला रामराम ठोकल्यानंतर त्याने द स्कॉर्पियन किंग, “फास्ट अँड फ्यूरियस 6” आणि “जुमान्जी”सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या.