मुंबई – भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज हिटमॅन रोहित शर्मा याने सरावाला प्रारंभ केला आहे. सराव सुरू झाल्याने आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये सरस व सातत्यपूर्ण कामगिरीसाठी मी आशावादी असल्याचेही त्याने सांगितले.
मार्च महिन्यापासून करोनाचा धोका वाढू लागल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले व सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. तसेच काही स्पर्धा लांबणीवर टाकल्या गेल्या. त्यामुळे सर्व खेळाडूंनाही घरातच राहावे लागले. आता देशात पाचवा लॉकडाऊन असला तरी मैदाने व क्रीडा संकुले खुली करण्याची परवानगी सरकारने दिल्यामुळे खेळाडूंनाही दिलासा मिळाला. सराव कधीपासून सुरू करता येईल याची मीदेखील खूप वाट पाहात होतो. शुक्रवारपासून सराव करण्यास प्रारंभ केल्याने गेल्या तीन महिन्यांमध्ये असलेली अस्वस्थता संपुष्टात आली आहे. आता आगामी काळात करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर सुरू होत असलेल्या स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करण्यासाठी मी आशावादी आहे, असे रोहितने सांगितले.
परिवाराला या काळात वेळ देता आला याचे समाधान आहे. हा सर्वच खेळाडूंसाठी खूप कठीण काळ होता. न्यूझीलंड दौऱ्यातून मला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती व मायदेशी परतावे लागले होते. तेव्हापासूनच मी घरात आहे. आता सराव सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा मानसिक नैराश्य झटकून सराव करत असल्यामुळे खूप आनंद होत आहे, असेही रोहितने सांगितले.
अनेक खेळाडूंचा सराव सुरू …
रोहितने सरावाला प्रारंभ केला असला तरी त्यापूर्वीच चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि ईशांत शर्मा यांनी सरावाला सुरुवात केली आहे. आता येत्या काळात बीसीसीआयदेखील भारतीय संघाचे अधिकृत सराव शिबिरही आयोजित करणार आहे.