शिमला – हिमाचल प्रदेशची सत्ता राखण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. त्या राज्यात भाजपचा राजकीय खेळ बिघडवण्यात बंडखोरांचा वाटा मोठा राहिला. हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. तेथील निवडणुकीत 99 अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले.
अपक्ष उमेदवारांमध्ये 28 बंडखोरांचा समावेश होता. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या 3 बंडखोरांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, तिघेही भाजपचे बंडखोर आहेत. बंडखोरीमुळे 12 जागांचे निकाल बदलले. त्याचा फटका भाजपच्या 8, तर कॉंग्रेसच्या 4 उमेदवारांना बसला.
हिमाचलमधील निवडणुकीने त्या राज्यात सत्ताबदल घडवून आणला आहे. कॉंग्रेसने 40 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामुळे तूर्त तरी हिमाचलमधील सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत 3 अपक्ष आमदारांना फारसे महत्व उरलेले नाही. त्या राज्याची सत्ता गमवावी लागलेल्या भाजपला यावेळी 25 जागांवर समाधान मानावे लागले.
Himachal : खुर्ची एक आणि दावेदार पाच; कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस वाढली
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेल्या गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री कोण होणार हे कालच जाहीर करून टाकले आणि शपथविधी सोहळ्याचा मुहुर्तही घोषित केला. मात्र प्रदीर्घ काळानंतर हिमाचमध्ये यशाची चव चाखलेल्या कॉंग्रेसमध्ये आता कौन बनेगा मुख्यमंत्री खेळ सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारण खुर्ची एक आणि दावेदार पाच असा मामला या राज्यात आहे. प्रतिभासिंह, सुखविंदर सिंग सुखु, मुकेश अग्निहोत्री आणि हर्षवर्धन चौहान हे अन्य दावेदार आहेत.