सिमला – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत गुंतले आहेत. त्यामुळे ते गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांतील प्रचारासाठी फारसा वेळ देऊ शकणार नसल्याचे सूचित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसच्या सरचिटणीस आणि राहुल यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी हिमाचलातील पक्षाच्या प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहेत.
प्रियंका यांनी काही दिवसांपूर्वी हिमाचलमध्ये कॉंग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्या प्रचारासाठी हिमाचलात दाखल झाल्या. कांगडामध्ये जाहीर सभा घेत त्यांनी मतदारांवर अनेक आश्वासनांची खैरात केली. हिमाचलमध्ये कॉंग्रेस सत्तेवर आल्यास 1 लाख रोजगार उपलब्ध केले जातील. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली जाईल. प्रत्येक महिलेला दरमहा 1 हजार 500 रूपये अर्थसहाय्य दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरून त्यांनी सत्तारूढ भाजपवर टीकेची झोड उठवली.
हिमाचलमध्ये प्रामुख्याने भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढत अपेक्षित आहे. तेथील निवडणुकीच्या रिंगणात आपनेही उडी घेतली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून त्या पक्षाने संपूर्ण फोकस गुजरात निवडणुकीवर केलेला दिसतो. त्यामुळे हिमाचलात भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रचाराचाच अधिक जोर दिसेल.
भाजपकडे प्रचारासाठी बड्या नेत्यांची मोठी फळी आहे. त्याउलट, कॉंग्रेसचे प्रमुख नेते यात्रेत गुंतले आहेत. त्यामुळे प्रचाराची धुरा खांद्यावर घेण्यासाठी प्रियंका पुढे सरसावल्या आहेत. हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान होईल. प्रचाराची सांगता 10 नोव्हेंबरला होईल. त्यामुळे प्रचारासाठी आता आठवडाभरापेक्षाही कमी अवधी बाकी आहे.