उच्चभ्रूंच्या क्लबमध्ये ओळख वाढवून 11 जणांना तब्बल दीड कोटींना गंडा

कोंढव्यातील भामट्याचा औंधमध्ये कारनामा

पुणे – उच्चभ्रू सोसायटीतील व्यक्तींच्या क्लबमध्ये एका तरुणाने जाणीवपूर्वक प्रवेश घेतला. यानंतर त्यांच्याशी ओळख वाढवत 11 जणांना तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घातला. कोकणात सात हजार एकर जागा घेतल्याचे सांगत, त्यात गुंतवणुकीच्या आमिषाने त्याने ही फसवणूक केली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रणय उदय खरे (28, रा. मोनार्च गार्डन, साळुंखे विहार, कोंढवा) असे आरोपी तरुणाने नाव आहे. याप्रकरणी अश्विनीकुमार कांबळे (48) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ध्यानधारणा करणाऱ्या उच्चभ्रू व्यक्तींचा औंध परिसरात हा क्लब आहे. तेथे या व्यक्ती नियमीत येतात. येथे प्रणयने जाणीवपूर्वक प्रवेश घेतला. यानंतर येथील व्यक्तींशी परिचय वाढवत त्यांचा विश्वास संपादन केला. थोड्याच दिवसांत त्याने या सदस्यांना आपली जे.के.व्हेंचर्स नावाची कंपनी असल्याचे सांगत कंपनीने रत्नागिरी येथे 7 हजार एकर जागा घेतल्याचे भासवले. यातील एक एकर जागेत पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास पहिल्या 11 गुंतवणूकदारांना 1 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. यातून भरपूर नफा मिळेल, असे त्याने भासवले. याप्रमाणे त्याने 11 जणांकडून 1 कोटी 45 लाख 16 हजार रुपये घेतले.

 

त्याने जानेवारी 2017 मध्ये पैसे घेतल्यानंतर गुंतवणूकदारांना कोणताच परतावा दिला नाही. त्याने ध्यानधारणेचे काही कार्यक्रम प्रायोजित केले होते. खरेदी केलेल्या जागेत चंदन व शेवग्याची झाडे लावणार असल्याचे तो सांगत होता. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत गेला. त्याने हे पैसे परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी वापरले.’ याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.

 

आरोपीने विविध नावाने कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्याच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली असून, त्यात 20 बॅंक खात्यांचा समावेश आहे. याप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्याने गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाशी संपर्क साधावा.

– रजनिश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.