मुंबई – करोनाग्रस्त रूग्णांकडून उपचाराचे भरमसाठ बिल आकारणाऱ्या मुंबईतील के. जे. सोमय्या रुग्णालयाला मुंबई उच्च न्यायालयाने आज दणका दिला आहे. रूग्णांकडून वसुल केलेले दहा लाख रुपये हायकोर्ट रजिस्ट्रीकडे जमा करण्याचे आदेश शनिवारी न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने रुग्णालयाच्या प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणावर न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यावर अंतिम सुनावणी होईल, असेही स्पष्ट केले आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या काही रूग्णांवर के. जे. सोमय्या रुग्णालयाने 14 ते 28 एप्रिल दरम्यान उपचार केले. तसेच डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना तब्बल 12.5 लाखाचे बिलही आकारले. हा प्रकार म्हणजे चॅरिटेबल रुग्णालय असूनही गोरगरीब रूग्णांकडून पैसे उकळत निव्वळ नफा कमवण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत या विरोधात शोहेब शेख व इतर सहा जणांच्या वतीने ऍड. विवेक शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेची गंभीर दखल घेत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांकडून लाखों रुपयांची बिल वसूल केल्याच्या तक्रारींची धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी आपला अहवाल कोर्टात सादर केला. त्या अहवालाची दखल घेत न्यालयाने के.जे. सोमय्या रुग्णालयाला 10 लाख रूपये हायकोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.