-सुचेता कर्णिक
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही आम्ही सोसायटीतील मैत्रिणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून टेरेसवर भेटत असू. आमच्या ग्रुपमधील पिल्ले काकू, काळे काकू (वय अंदाजे 58-59 वर्षे) आणि आमची एक मैत्रीण स्मिता यांनी टेरेसवर रोज प्राणायाम व योगासने करायला सुरुवात केली. लॉकडाऊनमुळे मलाही सकाळी भरपूर वेळ होता. योगासनांची आवड असल्यामुळे मी त्यांच्यात सामील झाले. त्यानंतर सोसायटीतील एकेक मैत्रिणीला योगासने करायला येण्यासाठी आग्रह करू लागलो. पाहता पाहता बऱ्याचजणी योगासने करायला येऊ लागल्या.
आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या टेरेसवरही आमच्या काही मैत्रिणी योगासने करीत होत्या. त्यातील एक मैत्रीण गौरी धावपटू आहे. तिने बऱ्याच मॅरेथॉनमध्ये पदकं जिंकली आहेत. त्यामुळे तिला व्यायामाची बरीच माहिती आहे. ती दुसऱ्यांना व्यायामाची चांगल्याप्रकारे माहिती देते आणि व्यायमही छानप्रकारे करवून घेते. हळूहळू आम्ही सर्वजणी एकत्र व्यायाम करू लागलो. त्यामध्ये सूर्यनमस्काराची भर पडली. सुरुवातीला 5 नंतर 10, 12, 25 अशी संख्या वाढवत नेऊन आम्ही आमची क्षमता वाढवत गेलो.
आमच्या ग्रुपमधील जया ही योगासनाच्या शिकवणीला दोन वर्षे जात होती. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या तिची शिकवणी बंद झाली. त्यामुळे तीसुद्धा आमच्यात सहभागी झाली. ती शिकवणीमध्ये शिकलेली आसने आम्हाला शिकवू लागली. त्यामध्ये तिने “नादातुनी या नाद निर्मितो श्री राम जय जय जय जय राम’ या 9 मिनिटांच्या क्लीपवर 20 सूर्यनमस्कार करायला शिकविले. त्यामुळे आम्हाला याची चांगली गोडी लागली. नंतर एका दमात आम्ही 20 सूर्यनमस्कार करायला लागलो होतो. आमची एक मैत्रीण प्रज्ञा तिला तर सूर्यनमस्काराने झपाटलेलेच होते. ती घरी रोज सूर्यनमस्कार करीत होती. हळूहळू सूर्यनमस्कार वाढवत नेऊन तिने एके दिवशी 125 सूर्यनमस्कार केले.
आतापर्यंत सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या मैत्रिणींची संख्या वाढली. आम्ही योगदिनापर्यंत 108 सूर्यनमस्काराचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, हे लक्ष्य आम्ही मे महिन्यातच पूर्ण केले. तेव्हा आम्ही असे अनुभवले की, आपण एकत्र येऊन कुठलीही गोष्टी करायची ठरवली तर ती सहज पूर्ण करू शकतो. त्याचवेळेस आमची एक मैत्रीण रेश्मा जी सध्या आमच्या सोसायटीत राहात नाही, तिने एका दिवसात 300 सूर्यनमस्कार काढल्याचे कळाले. तेव्हा आम्ही ठरवले की, आपण 300 नाही, पण किमान 150 सूर्यनमस्कार तरी काढू शकतो. मग 150 सूर्यनमस्काराचा टप्पाही पार केला. नंतर ती संख्या 180, 200, 225, 260 अशी वाढवत नेऊन आज आम्ही 300 सूर्यनमस्कार पूर्ण केले.
आमचे प्रयत्न पाहून आमच्यातील तीन-चार मैत्रिणींच्या मुलीही आईला बघून प्रोत्साहित होऊन त्या आमचा ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. आज आमच्या ग्रुपमध्ये एकूण 20 जणी आहोत. यातील काही जॉब करणाऱ्या, काही बिझनेस करणाऱ्या, तर काही उत्तम गृहिणी आहेत. विशेष म्हणजे सगळ्याजणी गृहदक्ष आहेत. संध्याकाळीही एकत्र भेटणे होत असते. कुणाच्याही घरातून याबाबत तक्रार नाही.
आज आमच्या 300 सूर्यनमस्कारांपैकी शेवटच्या 20 सूर्यनमस्कारांचा कौतुकसोहळा पाहण्यासाठी आमच्या सगळ्यांची मुले, सासूसासरे आणि विशेष करून पतीदेवसुद्धा आले होते. आज शाळेत शिकलेल्या “एकीचे बळ’ या धड्याचे मर्म समजले.