-माधुरी तळवलकर
“द गेस्ट’ या शॉर्टफिल्ममध्ये सुरुवातीलाच रात्रीच्या वेळी निसर्गसुंदर डोंगराळ भागातील रस्त्याने जाणारी गाडी दिसते. छान गाणी ऐकत एक तरुण गाडी चालवत घरी निघाला आहे. अचानक गाडी बंद पडते. गाडीच्या बाहेर पडून तो चालायला लागतो. तेवढ्यात त्याला पत्नीचा फोन येतो. बायको बहुतेक त्याला जेवायला उशीर होतोय वगैरे म्हणते. कारण हा तरुण प्रेमाने हसून म्हणतो, “फ्रिजमध्ये ठेवून दे. मी आल्यावर घेईन.’ मोबाइलची बॅटरी संपत आल्याचेही तो तिला त्या वेळी सांगतो.
दूरवर एक बंगला दिसतो. दरवाजा ठोठावल्यावर घरातली वृद्ध स्त्री दार उघडते. इथे कुठे मेकॅनिक मिळेल का, असे तो तिला विचारतो. इतक्या रात्री या भागात मेकॅनिक कुठून मिळणार असे ती म्हणते, तेव्हा हा जायला निघतो. पण ती प्रेमाने म्हणते, “इतक्या थंडीत बाहेर कुठे थांबणार… इथे थांबा हवं तर. सकाळी माझा मुलगा फोन करून मेकॅनिकला बोलावून घेईल.’ हा तयार होतो. ती वयस्क स्त्री त्याला सांगते की, घरात मुलगा, नातू झोपलेत. शेजारीच लहानशी खोली आहे. एक लहान कॉट आहे, तिथे आराम कर.
दोन-चार तासांचाच तर प्रश्न असतो म्हणून तो चालेल म्हणतो. ती घरातून त्याच्यासाठी अंथरुण पांघरुण घेऊन येते. तो नम्रतेने तिच्याकडून ते आपल्या हातात घेतो. टॉर्च घेऊन ती त्याला त्या खोलीपर्यंत नेऊन सोडते. जाताना ममतेने त्याची चौकशी करते. त्याची पत्नी गरोदर असते आणि पुढच्याच महिन्यात त्याला बाळ होणार असल्याचं तो सांगतो. अविनाश तिवारीने वठवलेला तरुण अगदी खरा, नैसर्गिक वाटतो. या फिल्मचे दिग्दर्शन अयप्पा के. एम. यांचं आहे आणि कथा आहे परवीझ शेख यांची. देविंदर मदन हिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने, आवाजातून घरगुती प्रेमळ स्त्री उभी केली आहे.
खोलीत गेल्यावर ती म्हणते, खोलीला आतून कडी लागत नाही; तर मी बाहेरून कडी लावून जाते. तो बरं म्हणतो. निघताना पुन्हा ती आणखी काही हवंय का, पाणी देऊ का… वगैरे विचारपूस करते. मग विचारते, “सकाळी किती वाजता दार उघडू? सात वाजता चालेल?’ हो म्हटल्यावर ती आपुलकीनं म्हणते, “लवकर तर नाही ना होणार तुला?’ तोही हसून म्हणतो, “नाही, सात ठीक होईल.’ ती बाहेरून कुलूप लावून घरी जाते. हा दिव्याकडे बघत पडतो, डोळा लागतो. सकाळ होते…
शेवटी अगदी एक मिनिटाचा शॉट आहे. त्या आजी, त्यांचा मुलगा, सून आणि नातू त्यांच्या स्वतःच्या गाडीतून प्रवास करताना दिसतात. काय झालेले असते? “द गेस्ट’ शॉर्टफिल्म तुम्ही पाहिलीत तरच या आल्हाददायक कथेला अचानक दिलेली कलाटणी तुम्हाला पाहायला मिळेल.