हे तर सबसे ‘बुरे दिन’- संग्राम जगताप

पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघात वीज आणि पाण्याची बोंबाबोंब

कर्जत: ज्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’ चे गाजर दाखवून देशाची आणि राज्याची सत्ता काबीज केली, त्या लोकांमुळे सामान्य माणूस, शेतकरी, व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. स्वतः पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघात वीज, पाणी, रस्ते अशा पायाभूत सुविधांची समस्या आहे. कर्जत तालुक्‍यातील सितपूर या छोट्याशा गावात तीन महिने अंधार आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असतांना वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा टॅंकर पंधरा पंधरा दिवस पोहचत नाहीत. त्यामुळे भाजप सरकारचे हे अच्छे दिन नसून आतापर्यंतचे सबसे बुरे दिन आहेत, असा आरोप आ. संग्राम जगताप यांनी केला.

आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी कर्जत तालुक्‍यातील बाभूळगाव खालसा, नागलवाडी, नागापूर, सितपूर, निंबोडी आदी गावांत मतदारांच्या गाठीभेटी घेण्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी घोंगडी बैठका आणि कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी रतन पाबळे, भास्करराव कदम, अर्जून खेडकर, छबाबाई शिंदे, प्रविण घुले, नागलवाडीचे सागर बांदल, विलास काळे, गुलाब काका तनपुरे, महादेव गरसुळे, आसाराम जगताप, नागापूरचे सचिन निंभोरे, किरण पाटील, छत्रगुण निंभोरे, राहूल निंभोरे, सोपान जगताप, ज्ञानेश्वर निंभोरे, दीपक गांगुर्डे, दत्ता गायकवाड, कैलास शेवाळे, सुदाम गाडे, भास्करराव माने आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्रविण घुले, ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे, रामदास चौगुले, गंगा बोरुडे आदींची भाषणे झाली. कर्जत तालुक्‍यातील सितपूर आणि अन्य ठिकाणच्या जनावरांच्या छावण्यांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. याठिकाणी ग्रामपंचायतने नेमून दिलेल्या पिण्याच्या पाण्याचा टॅंकर नियमितपणे येत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली.

आ. जगताप म्हणाले, देशातल्या फसव्या आणि खोटारड्या लोकांनी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला. गेल्या पाच वर्षांत नोटबंदी, आरक्षण, कर्जमाफी आदी समस्यांमुळे आपल्या सर्वांना खूप त्रास झाला. हा त्रास आठवून येत्या 23 तारखेला संताप व्यक्त करत खासदारकीच्या निवडणुकीत या लबाड लोकांना धडा शिकवा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.