मल्लिका बनली भूत

बॉलीवूडच्या कलाकारांसाठी आता बिगस्क्रीनच्या बरोबर डिजीटल स्क्रीनचे आकर्षण वाढायला लागले आहे. वेबसिरीज हा नवीन प्लॅटफॉर्म कलाकारांना आपले टॅलेंट दाखवण्यासाठी उपलब्ध झाल्याने अनेक कलाकार आता वेबसिरीजमध्ये झळकायला लागले आहेत. बॉलिवूडमधील सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्दीकी, सनी लिओन कुणाल कपूर आणि सिरीजक्‍वीन एकता कपूरचा धाकटा भाऊ तुषार कपूरसारखे स्टार देखील या वेबसिरीजमध्ये तरंगायला लागले आहेत. आता त्यामध्ये मल्लिका शेरावतचीही भर पडणार आहे.

“बू…. सबकी फटेगी’ या हॉरर कॉमेडी वेबसिरीजमधून मल्लिका वेबवर्ल्डमध्ये उडी मारणार आहे. या वेबसिरीजची कथा काही मित्रांच्या गटाच्या आसपास हिंडत असते. या मित्रांनी एका उजाड आणि ओसाड, भीतीदायक रेस्टहाऊसमध्ये काही दिवस सुटी घालवण्याचा प्लॅन केलेला असतो. या रिसॉर्टमध्ये अर्थातच काही अतर्क्‍य घटना घडत असल्याचा इतिहास असतो आणि “भूत वगैरे काहीही नसते…’ असे मानणारे हे पब्लिक या रिसॉर्टवर हाच सगळा अनुभव घेण्यासाठी अट्टहासाने जातात. यांच्यामध्ये अन्य सर्वसामान्यांप्रमाणे दिसणारी मल्लिकाही देखील एक भूत असते. पण ती नक्की काय करते आणि तिच्यापासून कोणाला काय धोका होणार असतो, हे मात्र प्रत्यक्ष वेबस्क्रीनवरच बघण्याची मजा आहे.

मल्लिका म्हटले की, तिचा हॉट अंदाज आणि सेक्‍सी लुक सगळ्यांना आठवतो. तिच्या या इमेजमुळेच बॉलीवूडमध्ये तिच्या वाट्याला ठराविक साच्याच्या भूमिका येत गेल्या. गेल्या वर्षी तिने कमी सिनेमे करण्यामागचे एक कारण सांगितले होते. सिनेमातील हिरो “ऑफस्क्रीन’देखील आपल्याबरोबर “इंटिमेट’ व्हायला लागले होते. त्याला आपण विरोधही करू नये, अशी त्यांची विचित्र अपेक्षा होती. म्हणून आपण सिनेमेच कमी करायला सुरुवात केली असे ती म्हणाली. तिला हा अनुभव “मी टू’ला साजेसा आहे. पण त्यामुळे तिला सिनेमापासून दूर व्हायला लागले होते, हे खरे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.