उंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई

आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

उंब्रज (प्रतिनिधी): राज्यात गुटखाबंदी असताना पुणे – बंगळुरु महामार्गावरुन विक्रीच्या उद्देशाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकास मालवाहतूक वाहनांसह ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुटख्यासह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैभव यशवंत कुचकर (वय-३१, रा. शालिनीनगर, ढवळेश्वर काॅलनी, सांगली) असे या गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई केलेल्या संशयिताचे नाव आहे. घटनेची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वैभव कुचकर त्याच्याकडील मालवाहतूक वाहनातून (क्रमांक – एमएच १०-बीआर ४२२५) महामार्गावरुन कोल्हापूरकडून साताऱ्याकडे निघाला होता. तळबीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी निलेश विभुते व सहकारी तासवडे टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करीत असताना हे मालवाहतूक वाहन तपासणीसाठी चालक वैभव कुचकर याने थांबवले नाही.

विभुते यांना संशय आल्याने त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करुन ते वाहन वराडे गावच्या हद्दीत पकडले व त्यानंतर त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विक्रीसाठी नेण्यात येणारा गुटखा माल असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर हे वाहन तळबीड पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासनास याबाबतची माहिती देऊन सदर वाहन चालकावर अन्न व औषध प्रशासन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

संशयित वैभव कुचकर यास पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अन्नसुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी याबाबतची तक्रार तळबीड पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी पकडलेला मुद्देमाल पंचनाम्यानंतर तो अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.