मुंबई – निसर्ग चक्रीवादळानंतर एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबई शहरासह उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. मुंबईतील दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, किंग्ज सर्कल या भागात पावसाने जोर धरला होता. तर दुसरीकडे गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली परिसरात विजेच्या कडकडाटांसह पाऊस कोसळला.
मुंबईत होणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. किंग्ज सर्कल, मालाड या काही भागात रस्त्यांवर पाणी साचले. तसेच वाहनांमध्ये पाणी गेल्यामुळे वाहने बंद पडली. तर विलेपार्ल्यात अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, नालासोपारा, वसई विरार या ठिकाणीही मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती.