ताम्हिणी, धावडी, कोयना आणि लोणावळ्यात मुसळधार
पुणे – घाटमाथ्यावर सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. ताम्हिणी, धावडी, कोयना आणि लोणावळा परिसरात अतिवृष्टी झाली असून तब्बल 200 पेक्षा अधिक मिमी पावसाची नोंद झाली.
आजही ताम्हिणी घाट परिसरात गेल्या 24 तासांत विक्रमी 350 मिमी पावसाची नोंद झाली. तर धावडी येथे 320, कोयना परिसरात 307 मिमी पाऊस झाला.
मागील तीन दिवसांपासून घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, रस्ता खचणे, वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरणे, मातीचे ढिगारे कोसळणे अशी आपत्ती घडत आहे. तसेच, डोंगरमाथ्यावरून पडणारे धबधबे, नदी, नाले यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी शेजारी आणि डोंगरमाथ्यावरील वसाहतीतील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडून डोंगरमाथा परिसरातील (अवघड क्षेत्रातील) शाळा, अंगणवाड्या बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पर्यटन लांबणीवर टाका
पुणे जिल्ह्यासह आसपासच्या घाटमाथा परिसरात हवामान विभागाने “ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तर काही भागात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे घाटमाथा परिसरात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनो पावसाळी पर्यटन जरा लांबणीवर टाका, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत घाटमाथ्यावर पर्यटन जीवावर बेतू शकते. दरड कोसळणे, रस्ता खचणे यासह अन्य नैसर्गिंग आपत्तीमुळे दुर्घटना घडू शकते. त्यामुळे नागरिकांनो सतर्क रहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.