पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरण 55.55 टक्के भरले आहे. तर पानशेत धरण 46.66 टक्के, वरसगाव धरण 44.81 टक्के इतके भरले आहे.
खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 12.90 टीएमसी म्हणजे 44.26 टक्के इतका जमा झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये मागील चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणांत येवा वाढला झाला असून तळाशी गेलेल्या धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ होऊ लागली आहे.
दरम्यान, खडकवासला धरणात मागील 24 तासांत 17 मिमी, पानशेत धरणात 73 मिमी, वरसगाव मध्ये 72 मिमी आणि टेमघर धरणात 125 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.