दुबई – प्रमुख फलंदाजांना आलेल्या अपयशानंतर शेमरन हेटमायरने केलेल्या वादळी फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर दिल्लीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 137 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची फलंदाजीही ढासळली होती. पॉथ्वी शॉ व शिखर धवन यांनी संघाला थाटात सुरुवात करून दिली. मात्र, शॉ याने विनाकारण आक्रमक खेळताना आपली विकेट गमावली. त्यानंतर श्रेयस अय्यरने निराशा केली. कर्णधार ऋषभ पंतने धवनला साथ देत संघाचा डाव सावरला.
या जोडीने संघाचे अर्धशतक फलकावर लावले. पंतही स्थिरावल्यावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या रिपल पटेलनेही धवनच्या साथीत दडपण कमी केले. तो देखील आनावश्यक फटकेबाजीचा बळी ठरला. दरम्यान, अर्धशतकाकडे कूच करणारा धवनही बाद झाला व दिल्ली संघाचा पराभव दिसू लागला.
त्याचवेळी हेटमायरने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने वादळी फलंदाजी करताना संघावरचे पराभवाचे सावट दूर केले. त्याने केवळ 18 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने नाबाद 28 धावांची खेळी केली व संघाचा विजय साकार केला. हेटमायरला अक्सर पटेलने मोलाची साथ दिली व संघाची पडझड थांबवली. मात्र, पटेलही बाद झाल्यामुळे चेन्नईसाठी संधी निर्माण झाली होती. मात्र, दुसऱ्या बाजूने हेटमायरने पूर्ण संयम दाखवताना चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याला कागिसो रबाडाने नाबाद 4 धावा करत सुरेख साथ दिली व संघाचा विजय साकार केला.
अंबाती रायडू याने जिगरबाज फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 5 बाद 136 धावा अशी समाधानकारक मजल मारली.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केले. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर तसेच गेल्या सामन्यातील शतकवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड या सामन्यात मात्र, अपयशी ठरला. त्यापूर्वी फाफ डुप्लेसीनेही निराशा केली.
त्या पाठोपाठ मोईन अली व रॉबिन उथप्पा यांनाही साफ अपयश आले. यावेळी चेन्नईची 4 बाद 64 अशी बिकट स्थिती बनली होती. अखेर रायडूने कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह संघाचा डाव सावरला. या जोडीने 5 व्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली व संघाला सव्वाशे धावांपेक्षा जास्त मजल मारून दिली. दरम्यान, रायडूने आपले अर्धशतक पूर्ण केले. धोनीही स्थिरावल्यानंतर बाद झाल्याने त्यांना संघाचे दीडशतक फलकावर लावण्यात अपयश आले. धोनीने 27 चेंडूत 18 धावांची संथ खेळी केली. रायुडूने 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 55 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक –
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 5 बाद 136 धावा. (रॉबिन उथप्पा 19, महेंद्रसिंह धोनी 18, ऋतूराज गायकवाड 13, फाफ डुप्लेसी 10, अंबाती रायडू नाबाद 55, अक्सर पटेल 2-18, रवीचंद्रन अश्विन 1-20). दिल्ली कॅपिटल्स – 19.4 षटकांत 7 बाद 139 धावा. (शिखर धवन 39, पृथ्वी शॉ 18, रिपल पटेल 18, ऋषभ पंत 15, शेमरन हेटमायर नाबाद 28, कागिसो रबाडा नाबाद 4, शार्दुल ठाकूर 2-13, रवींद्र जडेजा 2-28).