दुबई – आयपीएल स्पर्धेतील पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यातील सामन्यात ज्या प्रकारे पंचगिरी झाली त्यावरून आता आजी माजी क्रिकेटपटू, तसेच स्पर्धेतील पंजाबसह अन्य काही संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यूझीलंडचा माजी कसोटी स्कॉट स्टायरीस याने तर अशा पंचांना हटवण्याचीच मागणी केली आहे.
पंजाब आणि बंगळुरू दरम्यान रविवारी झालेल्या या सामन्यात डीआरएस निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे बंगळुरूच्या देवदत्त पडिक्कलला पंजाबविरोधात झालेल्या सामन्यात पंचांनी नाबाद ठरवले होते. बंगळुरूच्या डावातील आठवे षटक सुरू असताना रवी बिष्णोईच्या चेंडूवर बंगळुरूचा फलंदाज देवदत्त पडिक्कलने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने हा झेल घेतला व पंचांकडे दाद मागितली. चेंडू पडिक्कलच्या हाताला लागल्याबद्दल राहुल व गोलंदाज बिष्णोई यांना विश्वास होता.
पंचाने मात्र, हे अपील फेटाळून लावले. मग राहुलने डीआरएस घेतला. टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू पडिक्कलच्या ग्लोव्हजला लागल्याचे स्पष्ट दिसत होते. तरीही तिसरे पंच के. श्रीनिवासन यांनी त्याला संशयाचा फायदा (बेनिफिट ऑफ डाऊट) देत नाबाद ठरवले. या निर्णयानंतर राहुल नाराज जाला व त्याने मैदानावरील पंचांशी चर्चाही केली.
या निर्णयावर संताप व्यक्त करताना न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू व समालोचक स्कॉट स्टायरिस याने तिसरे पंच के. श्रीनिवासन यांना हटवण्याची मागणी केली. तसेच भारताचा माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रानेही संताप व्यक्त केला आहे. या निर्णयावर पंजाब संघानेही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्विट करत निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.