पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेच्या आराखड्यावर पाच हजारांहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या हरकतींवर शुक्रवारी (दि.25) चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात सकाळी दहापासून सुनावणी होणार आहे. हरकतदारांनी घेतलेल्या हरकतीनुसार प्रभागरचना कशी होणार त्यांचा नकाशा सुनावणी दरम्यान स्क्रीनवर दाखविला जाणार आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
त्रिसदस्यीय एकूण 46 प्रभागांसंदर्भात एकूण 5 हजार 684 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्या हरकतींचे आठ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. त्या गटानुसार हरकती नोंदविणाऱ्या अर्जदारांना नोटीसा देऊन सुनावणीसाठी वेळापत्रकानुसार बोलविण्यात आले आहे. करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. ज्यांना नोटीस मिळाली नाही त्यांना महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात तसेच, महापालिकेच्या संकेतस्थळावर ती पाहता येणार आहे.
दिवसभरात पूर्ण होणार सुनावणी
सुनावणी चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात होणार आहेत. सकाळी दहा वाजता सुनावणीला सुरूवात केली जाणार आहे. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे सुनावणी घेणार आहे. हरकती घेणाऱ्या व्यक्तीनुसार प्रभागरचना कशी होईल, याचा नकाशा स्क्रीनवर दाखविला जाणार आहे. ही सुनावणी दिवसभरात पूर्ण केली जाणार असून सुनावणीचा अहवाल 2 मार्चला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे.