नवी दिल्ली – केरळातील सबरीमला देवस्थानसह देशातील विविध धार्मिक स्थळांमध्ये स्त्रीयांच्या प्रवेशा बाबत भेदभावाचे नियम पाळले जातात. त्यासंबंधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधिशांच्या पीठापुढे आज पासून सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधिश बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे ही सुनावणी सुरू झाली आहे. या विषयावर या आधी पाच न्यायाधिशांच्या पीठापुढे सुनावणी झाली आहे. त्यांनी हा विषय आता अधिक न्यायाधिशांच्या पीठाकडे निर्णयासाठी सुपुर्त केला आहे त्यामुळे आम्ही केवळ त्यावरच सुनावणी घेत आहोत, सबरीमला प्रकरणातील निर्णयाच्या फेरविचार याचिकांवर आम्ही सुनावणी घेत नाही असे सरन्यायाधिशांनी आजच्या सुनावणीत स्पष्ट केले.
केवळ हिंदुच नव्हे तर मुस्लिम आणि अन्यही धार्मिक ठिकाणांवर महिलांच्या बाबतीत भेदभावाचे नियम आहेत. अनेक ठिकाणी महिलांना प्रवेशच नाकारला जातो. त्यामुळे धार्मिक आणि कायदेविषयक गुंतागुंतीची स्थिती अशा प्रसंगात निर्माण झाल्याने त्यावर नऊ न्यायाधिशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे.