पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या आवारात सुविधांचा अभाव
पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आवारात कचऱ्याचे ढिग पडले आहेत. शौचालयाची दुरवस्था झाली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधी पसरल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध नाही. अस्ताव्यस्त वाहने लावली जात असल्याने ये-जा करण्यास जागा रहात नाही.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आवारात अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण, समग्र शिक्षा अभियान, शालेय पोषण आहार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही राज्यस्तरावरील कार्यालये आहेत. पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक, वेतन पथक, शाळा न्यायाधिकारी ही कार्यालयेही याच आवारात आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. राज्यभरातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी, कर्मचारी सतत कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त या ठिकाणी येत असतात. त्यामुळे ही सर्वच कार्यालये नेहमी गर्दीने गजबजलेली असतात.
कार्यालय आवारात ठिकठिकाणी कचरा जमा झाल्याचे दिसून येते. तो उचलण्यासाठी कोणतीच व्यवस्था उपलब्ध नसणे हे आश्चर्यकारक आहे. या कचऱ्यामुळे सतत घाण वास पसरत आहे. यामुळे डांसाचे प्रमाणही वाढत आहे. त्यातच अनेकदा कचऱ्याचे ढिग पेटवून देण्यात येतात. यामुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या त्रासाचाही सामना अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना करावा लागतो. कारंज्याचे डबकेही घाणीने भरले आहे.
शौचालय केवळ नावापुरतेच राहीले आहेत. यात पाण्यासह इतर कोणत्याच सुविधा नाहीत. फरशा व इतर साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे. शौचालय लिकेच आहेत. परिसरात दुर्गंधी असते. यामुळे महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालय आवाराबाहेर असलेल्या चर्च मधील शौचालयाचा वापर करावा लागतो. अंपगांसाठी स्वतंत्र शौचालय बांधले आहे.