तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेत स्थायी समितीची मंजुरी न घेताच दुरूस्ती केलेला अंदाजपत्रक सभागृहात मांडण्यात आला. पण या मुद्यांवरून शुक्रवारी (दि. 28) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची विशेष सभा गाजली. विरोधकांनी प्रश्नांचा भडिमार करीत नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आणि नगरपरिषद प्रशासनास जेरीस आणले. प्रचंड गदारोळाची परिस्थिती पाहून नगराध्यक्षांनी सभा अखेर अनिश्चित काळासाठी तहकूब केली.
नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली गतवर्षीच्या अंदाजपत्रकातील दुरूस्ती आणि आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर विचार करून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड उपस्थित होते.
दरम्यान, विरोधी बाकावरील तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी कोरम अभावी सभा तहकूब करण्याची सूचना केली. नगराध्यक्षांनी 10 मिनिटांसाठी सभा तहकूब केली. त्यानंतर 11 वाजून 40 मिनिटांनी सभेस सुरवात झाली.
ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांची संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपाचे सभागृह नेते अमोल शेटे यांनी मांडला. याचे सर्व सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.