चाकण बाजारभाव : टोमॅटो, कोबी, दोडक्याची विक्रमी आवक,
महाळुंगे इंगळे -खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर राहूनही भाव गडगडले. बटाटा, जळगाव भुईमूग शेंगा यांची आवक घटली. लसणाची आवक स्थिर राहूनही भावात थोडीशी घसरण झाली. बटाट्याची आवक घटल्याने बटाट्याचे भाव तेजीत राहिले.
फळभाज्यांच्या बाजारात हिरव्या मिरचीची आवक घटूनही भाव स्थिर राहीले. टोमॅटो, कोबी, दोडका व कारली यांची भरपूर आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व पालक भाजीची भरपूर आवक झाली. कोथिंबीर, शेपूची किरकोळ आवक झाली.
जनावरांच्या बाजारात जर्शी गायी, शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली, तर बैल व म्हशींच्या संख्येत किरकोळ घट झाली. एकूण उलाढाल 6 कोटी, 30 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 20 हजार क्विंटल झाली गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कांद्याचे भाव गडगडले. कांद्याचा कमाल भाव 2 हजार 300 रुपयांवरून 2 हजार 100 रुपयांवर स्थिरावला.
तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1150 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या ही आवक 50 क्विंटलने घटल्याने भावात 400 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1400 रुपयांवरून 1800 रुपयांवर पोहोचला.
जळगाव भुईमूग शेंगांची आवक 6 क्विंटल झाली गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 9 क्विंटलने घटूनही कमाल भाव 10 हजार स्थिरावला. लसणाची एकूण आवक 5 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही भावात 2 हजार रुपयांची घसरण झाली. लसणाचा कमाल भाव 14 हजार रुपयांवरून 12 हजार रुपयांवर स्थिरावला.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 150 क्विंटलने घटूनही भाव स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला 2 ते 3 हजार रुपये असा भाव मिळाला.
जनावरे – चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 90 जर्शी गायींपैकी 45 गाईची विक्री झाली. (10 ते 50 हजार रुपये), 110 बैलांपैकी 70 बैलांची विक्री झाली.(10 ते 35 हजार रुपये), 130 म्हशींपैकी 90 म्हशींची विक्री झाली. (20 ते 80 हजार रुपये), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 8845 शेळ्या-मेंढ्यापैकी 8570 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1 हजार 200 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला.