जामखेड -मध्यंतरीच्या काळात जवळजवळ करोनामुक्त झालेल्या जामखेड तालुक्यात पुन्हा करोनाची एन्ट्री झाली आहे. तालुक्यातील एका युवकाचा बुधवारी करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सादर व्यक्ती सासऱ्याला भेटायला मुंबईला जाऊन आली होती, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी दिली.
दरम्यान करोनमुक्त झाल्याने शहरातील बाजार पेठा चालू असून, दरदिवशी बाजारपेठेत खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी आणि गर्दीदरम्यान नियमांचे होणारे सर्रास उल्लंघन आता नित्याचेच झाले आहे. मात्र शहरवासीयांकडून सुरू असलेली ही बेफिकीरी आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जामखेड तालुक्यातील जवळका येथील युवक हा मुंबई येथे असलेल्या सासऱ्याला सहा दिवसांपूर्वी भेटायला गेला होता. तो रविवारी (दि.21) खर्डा येथे क्वारन्टाइन होण्यासाठी आला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी त्यास स्वॅब घेण्यासाठी नगर येथे पाठवले होते. त्याचा बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन महिन्यांनंतर प्रथमच करोनाचा पुन्हा जामखेडमध्ये शिरकाव झाला आहे. आरोग्याधिकारी डॉ. सुनील बोराडे या युवकास डॉ. आरोळे हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात घेऊन गेले. तेथे त्याची अधिक चौकशी केली.
मुंबई येथे करोना पॉझिटिव्ह असलेल्या सासऱ्याला भेटायला गेलो होतो, असे याने सांगितले. त्यामुळे सदर युवकाला त्यांनी तातडीने नगर येथे स्वॅब तपासणीसाठी रविवारी पाठवले होते. आज त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने कठोर भूमिका बजावण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपूर्वी पर्यंत 100 च्या घरात असलेला करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 300 पार जाऊन चक्क 328 झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोना हळूहळू पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जिल्ह्यात नागरिकांना घराबाहेर पडण्याची सूट मिळाल्यापासून करोना ग्रामीण भागातही पसरला आहे.
सुरुवातीला केवळ शहरापुरता मर्यादीत असलेल्या या करोनाचा आता ग्रामीण भागातही संसर्ग झाला आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत शहरात असलेला करोनाचा धोका जवळ-जवळ संपत आला होता. त्यामुळेच शहरातील सर्व प्रतिबंधित क्षेत्र खुले करण्यात आले होते. असे असतानाच तालुक्यातील एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे तालुक्यात करोनाची पुन्हा एन्ट्री झाल्याचे दिसून आले.
एकावर विनापरवाना फिरत असल्याने गुन्हा दाखल जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक व्यक्ती मुंबई येथील चेंबूर परिसरातून गावात आली आहे. ही व्यक्ती चारचाकी वाहनातून गावात फिरत असल्याचे करोना सुरक्षा समितीला कळताच त्यांनी या व्यक्तीकडे प्रवास परवाना व वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत चौकशी केली. मात्र तो त्याच्याकडे नसल्याने पोलीस पाटील विक्रम डमरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेडकरांना बेफिकिरी नडणार
तालुक्यात नवे करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. असे असले, तरी याचा परिणाम शहरातील नागरिकांवर झालेला दिसून येत नाही. करोनाचा धोका वाढत असताना नागरिक मात्र बिनधास्त घराबाहेर फिरत असलेले दिसून येत आहेत. एकीकडे प्रशासन करोनासोबत दोन हात करण्यासाठी जीवाचे रान करीत आहे, तर दुसरीकडे नागरिक बेफिकीरीने वागण्यात आहेत. मात्र आता नागरिकांचा हिच बेफिकीरी नडणार आहे.