नवी दिल्ली : देशात सध्या करोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता रोजच नवीन बाधितांची आकडेवारी समोर येताना पाहायला मिळत आहे. शनिवारी देशात करोनाच्या 4 हजाराच्या जवळपास नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी 3 हजार 824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
मागील 6 महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठा प्रमाणात बाधितांची संख्या वाढली आहे. तसेच, गेल्या सात दिवसांत ज्या प्रकारे बाधितांमध्ये वाढ होत आहे. ही वाढ करोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरची सर्वाधिक वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात 26 मार्च-1 एप्रिल या कालावधीत भारतात 18,450 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जी आधीच्या आठवड्यातील 8,781 पेक्षा दुप्पट आहे. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची वेळ 7 दिवसांपेक्षा कमी राहिली आहे.
मागच्यावेळी तिसऱ्या लाटेत दिवसागणिक आकडे आठवडाभरात दुप्पट होत होते. मात्र, या काळात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात करोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी हा आकडा 29 होता.