वडील, बाबा, आण्णा अशा अनेक नावांनी “बाप’ नावाचा माणूस ओळखला जातो. पण “बाप’ या शब्दाची सर यातील कोणत्याच शब्दाला नाही, हे मी ठामपणे सांगू शकते. कारण माझा “बाप’ हा साऱ्यांचा “बाप’च आहे, हे मी असंख्य वेळा अनुभवलंय – आदिती कैलास गायकवाड
माझ्या वडिलांची मला सर्वांत आश्वासक वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी! माझा भाऊ अजिंक्य याच्या अचानक जाण्याने आमच्या घरावर जणू आभाळच कोसळलं! एकुलता एक मुलगा जाण्याचं दु:ख त्यांनाही होते; पण त्यांनी स्वत:ला सावरून घराला आधार दिला. मला उच्च शिक्षणासाठी केवळ प्रोत्साहनच दिलं असं नाही तर माझी मुलगी हाच माझा मुलगा’ असं मानून त्यांनी मला घडविलं! आपल्या वडिलांविषयी वाटणारी कृतज्ञता “फादर्स डे’ निमित्त आदिती यांनी व्यक्त केली.
“माझे पप्पा’ कायमच माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. मुलगी म्हणून त्यांनी मला ना कधी दुय्यम वागणूक दिली; ना कधी कोणते निर्णय माझ्यावर लादले. आयुष्यात कोणतेही संकट आलं तरी संयमाने त्यावर कशी मात करायची हा त्यांच्यातील गुण मला नेहमीच भावला आहे. त्यामुळेच मोठं संकट आलं तर आपल्या तोंडून आपसुकच “बाप रे’ असा शब्द का बाहेर पडतो; याची जाणीव मला होते.
त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत मी राजकारणात आले असले; तरी या क्षेत्रात येण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझाच होता. पुणे शहर युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदावर मी सध्या कार्यरत आहे. औंध परिसरात गायकवाड घराण्याला एक राजकीय वारसा असला तरी वडिलांनी स्वबळावर राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं आहे. 20-25 वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. नगरसेवक पदाची पहिली निवडणूक लढविताना एका मोठ्या राजकीय पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं होतं. त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला होता; परंतु खचून न जाता त्यांनी वाटचाल सुरूच ठेवली. सध्या राजकारणात पक्षांतराचे वारे वाहात आहेत. पण कॉंग्रेसची साथ न सोडता निष्ठावान कार्यकर्त्याची भूमिका ते कसोशीने पार पाडत आहेत. त्यांची हीच जिद्द, निष्ठा मला आदरस्थानी आहे!!!
सुरुवातीच्या काळात दुग्धव्यवसाय सांभाळत असल्यापासून ते सर्वांशी मिळून-मिसळून वागत. आज राजकारणातही हाच शिरस्ता त्यांनी जपला आहे. पक्षातही विविध पदांवर त्यांनी कामं केली. राजकारण वा व्यवसायक्षेत्र कोणतेही असो; तू माझ्यापेक्षा चांगलं काम कर’ असे म्हणत ते नेहमीच मला प्रोत्साहित करतात. मुलगी असूनही मला पाठिंबा देणारे “माझे पप्पा’ माझ्यासाठी निश्चितच खास आहेत!