नवी दिल्ली : राजधानी दिल्लीस्थित हजरत निजामुद्दीन दर्गा ६ सप्टेंबरपासून भाविकांसाठी खुला होणार आहे. दर्गा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. कोविड-१९ लॉकडाउनमुळे दर्गा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता जरी तो खुला होत असला तरी या ठिकाणी कोविड-१९ आजारासंदर्भातील सर्व काळजी घेतली जाणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले जाणार आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली.
हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे प्रभारी सय्यद आदिब निझामी यांनी याविषयी बोलताना, “दर्गा ६ सप्टेंबरपासून खुला होत आहे. दरम्यान, कोविड संदर्भात सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची तयारी केली आहे. लॉकडाउनमध्ये आम्ही दर्गा बंद ठेवला होता. मात्र, आता सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही दर्गा खुला करत आहोत.”
दरम्यान, दिल्लीतील करोनाच्या परिस्थितीबाबत दिल्लीच्या आरोग्य विभागाने सांगितले की, दिल्ली देशातील इतर शहरांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेले शहर आहे. ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत २९१४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशाच्या राजधानीत एकूण करोनाबाधितांची संख्या १.८५ लाख वर पोहोचली. शहरात सध्या १८,८४२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, तर बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १.६१ लाख आहे.